टेट परीक्षा निकालावर शंका वाढल्या...
● पहिल्या चार दिवसातील परीक्षार्थीना नॉर्मलायझेशनचा फटका
● उत्तरपत्रिकेची पीडीएफ परीक्षार्थींना उपलब्ध व्हावी
Maratha Editorial :-
शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या (टेट) निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला. निकाला नंतर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता नॉर्मलायझेशनचा फटका पहिल्या चार दिवसात परीक्षा झालेल्या विध्यार्थ्यांना बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेने सर्वच विद्यार्थांना त्यांनी सोडविलेल्या पेपरच्या प्रश्नासह उत्तरपत्रिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी विध्यार्थ्यां मधून जोर धरत आहे. परीक्षा ऑनलाइन झाली असल्याने इतर ऑनलाइन परीक्षा प्रमाणे उमेदवारांना त्यांची पीडीएफ स्वरूपातील उत्तरपत्रिका उपलब्ध करून देणे सहज शक्य होणार आहे.
◆ निकालाबाबत परीक्षार्थ्यांकडून साशंकता
अनेक विध्यार्थ्यांना १५० पेक्षा अधिक गुण मिळाल्याने निकालाबाबत परीक्षार्थ्यांकडून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी मर्यादित वेळ, प्रश्नांची संख्या आणि काठीण्य पातळीचा विचार करता २०० पैकी १५० पेक्षा अधिक गुण मिळवणे अनेक परीक्षार्थ्यांना अशक्य वाटत आहे. त्यामुळे १५०पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी व्हावी अशी मागणी परीक्षार्थी कडून होत आहे. दिव्यांग उमेदवारां मधून केवळ अल्पदृष्टी प्रवर्गातील परीक्षार्थीना २०० ऐवजी १८० गुणांचा पेपर होता तसेच वेळ सुद्धा ४० मिनिटे वाढवून मिळाला. बाकी दिव्यांगाना सूट मिळाली नसल्याने सुद्धा नाराजी व्यक्त होत आहे. तसेच मदतनीस घेताना सुद्धा कोणतेही नियम न लावता अनेकांनी बँक परीक्षा देणाऱ्याना मदतनीस घेऊन परीक्षा दिल्याची माहिती समोर येत आहे.
◆ दोनशे जणांना मिळाले झिरो गुण
राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवरील भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीत पात्र ठरणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयबीपीएस संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली. या परीक्षेसाठी दोन लाख ३९ हजार ७२६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४४ उमेदवारांनी परीक्षा दिली. डीएड, बीएड असूनही सुमारे दोनशे पेक्षा जास्त परीक्षार्थींना झिरो गुण मिळाले आहेत. त्यातच मागील काळात टीईटी परीक्षेतील घोटाळ्यामुळे उमेदवारांचा परीक्षा परिषदेच्या कारभारावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे या निकालावरही शंका उपस्थित करण्यात येत आहे.
◆ अभ्यास शिक्षक भरतीचा, पेपर आला बँकिंगचा!
परीक्षेत उमेदवारांना दोन तासांत २०० गुणांसाठी २०० प्रश्न विचारले होते.
बँकिंग परीक्षेच्या धर्तीवर प्रश्न विचारले जात असल्याने काठिण्य पातळी अधिक होती. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न सुद्धा अभ्यासक्रम संबंधित नव्हते.त्यामुळे या परीक्षेचा मागील वर्षभर अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थीवर अन्याय झाला आहे. याबाबत बीएड संघटनेने आवाज सुद्धा उठवला होता. शालेय शिक्षण विभागाने घाई घाईत सर्व परीक्षा प्रक्रिया राबविण्यामागे कारण काय असावे? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. एकूणच “अभ्यास केला शिक्षक भरतीचा आणि पेपर आला बँकिंग परीक्षेचा” अशी परिस्थिती भावी शिक्षकांची या परीक्षेत झाली असून परीक्षा परिषदेने किमान परिक्षार्थींची प्रश्न आणि उत्तरपत्रिका तरी पीडीएफ स्वरूपात त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य डीएड बीएड संघटना सुद्धा लवकरच परीक्षा परिषद तसेच शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
टिप्पण्या